महाराष्ट्राच्या मातीत स्वराज्याचा, स्वाभिमानाचा आणि त्यागाचा इतिहास कोरला गेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते आजच्या सीमेवरील प्रत्येक सैनिकापर्यंत, मराठी माणसाने देशप्रेम, निष्ठा आणि बलिदानाची परंपरा अखंड जपली आहे. ही परंपरा केवळ इतिहासाच्या पानांवर नाही, तर आजही देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात तैनात असलेल्या महाराष्ट्र सुपुत्रांच्या शौर्यातून जग अनुभवत आहे.
महाराष्ट्रातील केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचे जवान – हिमालयाच्या बर्फाळ शिखरांपासून ते वाळवंटातील तप्त सीमेपर्यंत, दहशतवादग्रस्त खोऱ्यांपासून ते नक्षलग्रस्त जंगलांपर्यंत – प्राणांची बाजी लावून उभे आहेत. भारतमातेची अखंडता अबाधित राहावी, देशांतर्गत शांतता नांदावी आणि बाह्य आक्रमणाचा प्रत्येक वार परतवून लावावा, या एकाच ध्येयाने ते अहोरात्र कर्तव्यावर तटस्थ आहेत.
त्यांचा हा त्याग केवळ वर्दीपुरता मर्यादित नाही, तर तो महाराष्ट्राच्या संस्कारांचा, आई-वडिलांच्या शिकवणीचा आणि मातीशी असलेल्या नाळेचा हुंकार आहे. प्रत्येक जवानाच्या हृदयात ‘राष्ट्र प्रथम’ हा मंत्र कोरलेला आहे आणि त्यासाठी सर्वोच्च बलिदान देण्याची तयारी त्यांनी जन्मापासूनच केली आहे.
*महाराष्ट्रातील जनतेला आमचे आवाहन आहे* – आपल्या या वीर सुपुत्रांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा. त्यांच्या कुटुंबियांची काळजी घेणे, त्यांच्या समस्यांना वाचा फोडणे आणि त्यांना सन्मानाची वागणूक देणे, हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. कारण सीमेवर लढणारा जवान निर्धास्त राहिला, तरच देश सुरक्षित राहील.
जय हिंद! जय महाराष्ट्र!